महिला सक्षमीकरण

'माहेर' (१५ ऑक्टोबर १९९६)


आजच्या गतीमान जीवनात स्त्री अर्थाजनासाठी घराबाहेर पडली आहे. अर्थात तिच्या मागण्या आणि गरजा वाढल्या आहेत. घरात राहून अल्प अर्थाजन करावे, अशा काही महिला आहेत. माहेर या आयामाद्वारे अशा महिलांकडून भाजणी, मेतकूट, मसाले, विविध प्रकारची लोणची पापड, मिरगुंड, बटाटा किस, चिकवड्या, दिवाळी फराळ, तिळगुळ इत्यादी पदार्थ बनविले जातात. या आयामातून १० महिलांना रोजगार मिळतो. आजपर्यंत ३००० लोकांनी याचा फायदा घेतला. या उपक्रमाद्वारे महिला मंडळाच्या कामाला सुरुवात झाली.

'स्वयंसिध्दा' (२० नोव्हेंबर १९९६)


या आयामाद्वारे महिलांना शिलाईचे प्रशिक्षण दिले जाते. आदिवासी महिला, विधवा, परित्यक्ता यांना यातून काम मिळते. नवनवीन कृत्रिम धाग्यांचे कपडे घालून लहान नवजात मुलांना त्रास होतो या विचाराने लहान मुलांसाठी सुतीच कपडे शिवावयाचे ठरविले. म्हणून बाळंतवीडे शिवावयाचे ठरविले. घरी राहून महिलांना रोजगार मिळून स्वतःच्या पायावर उभे करण्याचा प्रयत्न मंडळाने केला. आता फ्रॉक, रजया, विविध प्रकारचे कपडे शिवले जातात. ५०० महिलांना शिलाईचे शिक्षण मिळाले असून ३० महिलांना कायमस्वरूपी शिवण उद्योग प्राप्त झाला आहे.

'स्वाद भारती' (२२ फेब्रुवारी १९९९)


या आयामाद्वारे विविध ठिकाण काम कारणारे कर्मचारी पुरुष अथवा स्त्री, कॉलेजचे शिक्षणासाठी येणारी मुले यांना डबे देणे, शिवाय सणसमारंभासाठी मागणी केलेले पदार्थ अथवा नाश्ता तयार केला जातो. ताजे व चविष्ट अन्न २०० लोकांना पुरविले जाते. सरकारच्या शालेय पोषण आहार योजनेद्वारे दिला जाणारा आहार येथे बनवला जातो. या उपक्रमामुळे १० महिलांना काम मिळाले आहे. आनंदी वसतीगृहातील मुली व संजीवन आश्रमात राहणारे आजी आजोवांच्यासाठी भोजन बनविले जाते.

'स्नेह सखी' (३१ डिसेंबर २००३)


६० वर्षांवरील महिलांच्या अस्पष्ट होत गेलेल्या माहेरखुणा पुन्हा स्पष्ट व्हाव्यात, वर्षातून एक दिवसासाठी (३१) डिसेंबर) माधारपणाचे सुख अनुभवावे म्हणून स्नेहसखी स्थापन केली. स्नेहसखी मार्फत ४० ते ६० वयोगटातील महिलांसाठी आरोग्य विषयक माहिती देणारी डॉक्टर व अन्य तज्ञांची व्याख्याने आयोजित केली जातात. २० ते ४० व १६ ते २० वयोगटातील मुलींना त्यांच्या भावी आयुष्याकरिता विविध मार्गदर्शन केले जाते. या प्रकारचे अनेक मेळावे घेतले जातात. ५०० महिला या मेळाव्यात सहभागी झाल्या आहेत. दरवर्षी ३१ डिसेंबरच्या मेळाव्यात सहभागी होणाऱ्या महिलांना अल्पशी भेट वस्तू दिली जाते.

'आरोहिणी उद्योग केंद्र'


तरणखोप जवळ आरोहिणी उद्योग केंद्र आहे. महिलांसाठी विविध उद्योग निर्मिती करून रोजगार निर्मिती करणे आणि महिलांना सक्षम करणे या हेतूने हा उपक्रम सुरू आहे.

'नलिनी प्रशिक्षण केंद्र'


रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे या बरोबरच महिलांना विविध प्रशिक्षण देऊन सक्षम करणे या दृष्टीने नलिनी प्रशिक्षण केंद्राची सुरवात झाली. भेट कार्ड बनवणे, पाकीट बनवणे, भरतकाम, पॅच वर्क, महिला व लहान मुलांचे नाईट गाऊन, नाईट ड्रेस, तयार करणे तसेच इतर विविध शिवणकाम, विविध मसाले, लोणची तयार करणे अशा विविध प्रकारातून महिलांना प्रशिक्षण देणे आणि स्वयंरोजगारासाठी प्रोत्साहन करणे या हेतूने नलिनी प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत.

सामाजिक सुरक्षा

'कौटुंबिक सल्ला केंद्र' (१० जानेवारी १९९७)


एकत्र कुटूंब पध्दती जवळजवळ नाहीशी झाली आहे.बदलते समाजजीवन, आजुबाजूची विविध आकर्षणे यामुळे निर्माण होणार वाद-विवाद घरातच मिटत नसल्याने "कौटुंबिक सल्ला केंद्र स्थापन केले. या केंद्रातून ५० कुटूंबातील व्यक्तींना सल्ला दिला गेला. त्यापैकी ४५ व्यक्ती पुन्हा आपल्या कुटूंबात सुखाने रहात आहेत.

'स्नेहांगण'


अहिल्या महिला मंडळ संचलित दुसरा वृद्धाश्रम, मुंबई गोवा महामार्गावर तरणखोप गाव येथे आहे. सध्या इथे 17 वृद्ध राहतात, या सर्वांची काळजी घेण्यासाठी एक निवासी जोडपे व्यवस्थापक म्हणून आहे आणि 7 मावश्या स्वैपाक, स्वच्छता इत्यादी काम करण्यासाठी आहेत. एका रूम मध्ये 2 जण अशी व्यवस्था असून, टी व्ही, प्रत्येकी 2 कपाट, छोटा फ्रिज, स्वतंत्र स्वच्छतागृह इत्यादी सोयी उपलब्ध आहेत.

'संजीवन आश्रम' (२६ जून २००३)


नातवांसाठी झुला टांगणाऱ्या वृध्दांचे उर्वरीत आयुष्य सुखी, समाधानी, शांततेने जावे. याच वयात येणारे एकाकीपण नाहिसे व्हावे. त्यांच्या मनात विश्वास आणि सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी म्हणून “संजीवन आश्रम" सुरु केला. आज संस्था फक्त स्वतःच्या इमारतीत काम करत असल्याने आश्रमात ३३ ज्येष्ठ राहत आहेत. त्यामध्ये गतीमंद, मतीमंद, निराधार, विकलांग, मुकबधीर इत्यादींचाही समावेश आहे. आज ४० ज्येष्ठांची सर्व जबाबदारी संस्था उचलत आहे.येथे एकूण २० महिला कर्मचारी काम करीत आहेत. वृध्दांची तपासणी करण्यासाठी डॉक्टर नियमित येतात. एक परिचारीकाही काम करीत आहे. ज्येष्ठांसाठी ग्रंथालय, दूरदर्शन, फोन इत्यादी सेवा उपलब्ध आहेत.अहिल्या मंडळ हे विविध उपक्रम राबविते, या उपक्रमांना मंडळाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष भेटी देणाऱ्या असंख्य दात्यांचे मंडळ ऋणी आहे. त्यांच्या 'मदतीच्या हातां' मुळेच आज मंडळ यशस्वीपणे आपली वाटचाल करीत आहे. भविष्यातही सदैव यशोपथावरच वाटचाल करील हा भरवसा ! धन्यवाद !

'उद्योगिनी '


या उपक्रमात ३० महिलांना रजया शिवण्याचे प्रशिक्षण देऊन तयार केले आहे आणि त्यांना या उपक्रमातून कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध झाला आहे. गेली ७, ८ वर्षे मुंबई ग्राहक पंचायत च्या मासिक मागणी पत्रकात अहिल्या महिला मंडळाच्या रजयांची मागणी असते आणि वर्षातून एकदा साधारण नोव्हेंबर आणि डिसेंबर मध्ये ३ ते ४ हजार रजयांची मागणी पूर्ण करण्यात येते. या व्यतिरिक्त ग्राहक पेठ मधून विक्री होते, आणि पेण मध्ये संस्थेत येऊन रजया घेऊन जाणारी ग्राहक मंडळी देखिल खूप आहेत. मागणी नुसार रजयांचे कुरिअर सुद्धा करून मागणी पुरवठा केला जातो. वर्षभरात साधारण १० हजार रजयांची उलाढाल होते.

शिक्षण

'मुक्ताई विद्या मंदीर' (१० जून १९९७)


पेणपासून आठ कि.मी. अंतरावर हेटवणे प्रकल्प आहे. प्रकल्पाच्या वसाहतीत राहणाऱ्या मुलांना व आदिवासी पाड्यांवरील राहणाऱ्या मुलांच्या शिक्षणाची सोय व्हावी म्हणून प्रकल्प अधिकाऱ्यांच्या सांगण्यावरुन शिशु वर्ग ते ४ थी पर्यंत वर्ग सुरु केले. विद्यालयास 'मुक्ताई विद्या मंदीर' नाव दिले. छोट्या मोठ्या वर्गात मिळून पन्नास विद्यार्थी संख्येने सुरुवात केली. आज इयत्ता ४ थी पर्यंत ११० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.विना अनुदान तत्वावर चालवली जात असून ४ + २प्रशिक्षित शिक्षक २ मदतनीस सेविका मानधनावर काम करतात, शिक्षकांचे मंडळाच्या कार्यात फार मोठे व गोलाचे योगदान आहे. शाळेतून सुमारे भौजीपास होऊन ५०० विद्यार्थी बाहेर पडले आहेत. इ. ४ थी च्या २ विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप मिळाली आहे. दरार्थी शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल चांगला लागतो. शिक्षणाचा हक्क नाकारलेल्या मुलीचा खर्च संस्थेने केला आहे. त्या मुली आज १२वी पास होऊन कॉलेज शिक्षण घेत आहेत.

'इंदिरा संस्कृत पाठशाला' (१ जुलै २००३)


देववाणी संस्कृत भाषा आमचा वारसा आहे. परंतु काळाबरोबर धूसर होत चाललेली भाषेची ओळख लक्षात घेता सर्वसामान्य माणसांना सुध्दा या भाषेचा परिचय व्हावा आणि हा वारसा अखंड चालू राहावा म्हणून "इंदिरा संस्कृत पाठशाळेची" स्थापना केली. आज विविध विद्यालयात सुमारे ४०.००० विद्यार्थी-विद्यार्थीनी, पुरुष आणि महिला शिकत आहेत. १२ महिला पौरोहित्याचे शिक्षण घेऊन पौरोहित्य करू लागल्या आहेत.

'स्वानंद संस्कार वर्ग' (१४ फेब्रुवारी २००५)


मुलांवर संस्कार होण्यासाठी "स्वानंद संस्कार वर्ग"१४ फेब्रुवारी २००५ रोजी सुरु झाला. हिवाळी व उन्हाळी सुट्टीत हा वर्ग चालविला जातो. "विष्णुपंत भागवत ग्रंथालय व वाचनालय' (१७ जानेवारी २००९) वाचाल तर वाचालया उक्तीप्रमाणे मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, याशिवाय संजीवन वृध्दाश्रमात राहणाऱ्या आजी आजोबांनी त्याचा फायदा मिळावा म्हणून वाचनालय सुरुकेले. आज रोजी वाचनालयात ४५०० पुस्तक आहेत.

'आनंदी वसतीगृह' (१५ जून२००८)


डोंगर पाड्यांवर राहणाऱ्या सुमारे १० पाड्यांवरील (इ.३० ते इ.१२ मध्ये शिकणाऱ्या) कातकरी समाजातील २३ मुली, आनंदी वसतीगृहात रहात आहेत. त्यांचा खर्च चालावा म्हणून पालक योजना सुरु केली आहे. या मुलांची प्रगती समाधानकारक आहे. मुली येथे आनंदाने रहात आहेत.

आरोग्य

'डॉ. घाटे आरोग्य केंद्र' (४ मार्च २००४)


आर्थिक दुर्बल तसेच विविध पाड्यांवरील लोकांना वैद्यकीय उपचार सहज शक्य व्हावे म्हणून "डॉ. घाटे आरोग्य केंद्राची" स्थापना केली. प्रामुख्यानेशिबिरां मार्फत महिलांची रक्ततपासणी करुन हिमोग्लोबीनचे रक्तातील प्रमाण तपासले जाते. त्याचबरोबर मोफत व अल्पदरात तपासणी करुन, औषधे दिली जातात. त्याचबरोबर दरवर्षी दोन पाड्यांवरील सर्वांची आरोग्यविषयक तपासणी करुन उपचार केले जातात. याकरिता शिवीरांचे आयोजन केले जाते.

'पॅथॉलॉजिकल लॅब' (४ मार्च २००४)


या केंद्राद्वारे रक्त, मलमूत्र, थुंकीची तपासणी केली जाते. आजपर्यंत याचा लाभ २००० लोकांना मिळाला आहे. त्याशिवाय मुक्ताई विद्यामंदिरातील विद्यार्थी, कर्मचारी वर्ग, आनंदी वसतीगृहातील विद्यार्थिनींची आणि आजी आजोबांच्या विविध तपासण्या केल्या जातात.